Thursday, March 20, 2014

चढ़ाई तैल बैलाची

तैल बैलाचा आउटसोर्स इवेन्ट करायचा का?? एका ग्रुपची enquiry आली आहे…. भूषण चा whatssap वर मेसेज आला…. आणि सगळेच उडाले… अरे विचारतोस काय हो म्हणून सांग त्यांना… किती कॉस्ट ठेवायची… बजेट काय आपले याचे whatssap वर चर्चाचर्वण सुरु झाले…equipments ची जुळवाजुळव सुरु झाली… आमच्यातील विकेश, भूषण, चेतन (रावण) आणि  प्रमोद (तात्या उर्फ पनवेल जामात) यांनीच फक्त तैल बैलाला आपले पदस्पर्श लावून पावन केले होते त्यामुळे पूर्व तयारी म्हणून मुख्य इवेन्ट आधी रेकी करावी असे सर्वांचे मत पडले…

झाले रेकिच दिवस ठरला… आशिष सालाबाद प्रमाणे अर्ध्या पायावर तयार होता… भूषण lead climber म्हणून होताच… राजेश पण आला… अस्मादिकही कधी नव्हे ते तयार झाले…रावण गोव्यात हैदोस घालत होता आणि सुजित सांसारिक प्रपंचात अडकला होता… तात्या घरच सोडून बाहेर शेन खायला गेला होता… तैल बैलाच्या पायथ्याशी थेट जाण्यासाठी गाडीची सोय नसल्याने अक्का पण कट झाली…

शुक्रवार उजाडला… सकाळी सकाळी आशिषचा अस्मादिकांना फोन आला…कुठे आहेस…घरी आहे...office ला दांडी मारली आहे… असे उत्तर ऐकताच 'रावणाकडून २०० फुटी रोप घेऊन ये… मला शक्य नाही…कंपनीतून सुटायला वेळ होईल… मी तुला खारघरला भेटतो…' वाटल उगीचच सांगितला ह्याला घरी आहे म्हणून पण काय करणार नाईलाज होता…पडत्या फळाची आज्ञा समजून हो म्हणालो…

राजेश पुण्यावरून लोणावळ्याला बाईकने येणार होता… भूषणने ट्रेनचा मार्ग स्वीकारला… शेवटी रात्री ८. ३० वाजता बाईकला किक मारली आणि निघालो डोंबिवलीच्या दिशेने… चेतनच्या घरातून रोप घेतली आणि ठरल्याप्रमाणे खारघरकडे निघालो… आशिष आधीच पोचला होता… विकेशकडून अजून एक २०० फुटी रोप घेतली आणि अडकवली एकेक रोप दोघांनी गळ्यात… पनवेलला आशिषच्या मावशीकडे माझी बाईक लावली आणि त्याच्या बाईक वरून पुढच्या प्रवासासाठी निघालो तेव्हा रात्रीचे बरोबर १२.०० वाजले होते आणि राजेश लोणावळ्यात आधीच पोचला होता…एक वाजता लोणावळ्यात आमची बाईक पोहोचली… राजेश स्टेशनवर थांबला होता… शेवटी भूषणची वाट बघत आम्हा तिघांच्या शिळोप्याच्या गप्पा सुरु झाल्या…

बरोबर पावणे दोन वाजता भूषण आला… रोप गळ्यात अडकवून त्याचे स्वागत करावे असा राजेश आणि माझा बेत होता…पण भूषण आलाच तो मुळात तनतनत… काय करणार बिचारा ३ तास उभ्याने प्रवास करून आला होता…राजेश आणि भूषणने equipments ची मोजदाद केली… आम्ही सर्व सामान थोड़े थोड़े वाटून घेतले…  बॅगा भरल्या…  आणि एकदाचा  आमचा तैल बैलाच्या दिशेने प्रवास सुरु झाला….

लोणावळा स्टेशन सोडून फर्लांगभर पुढे गेलो आणि थोडी चुकामुक झाली…पण एकदाचा काय तो भुशी धरणाचा रस्ता सापडला आणि आम्ही मार्गाला लागलो…  राजेश आणि आशिष गाड़ी चालवत होते भूषण आणि मी मागे बसलो होतो… शेवटी काही अपिहार्य कारणांमुळे मी आणि आशिष गाडी चालवू लागलो…थोड़े पुढे जाताच रस्त्याच्या डाव्या हाताला लागणारा कोरीगड़ दिसला आणि २ वर्षापूर्वी भर पावसात केलेल्या ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या… Amby Vally च्या कृपेमुळे रस्त्याची अवस्था उत्तम होती…  पण जसा मुख्य रस्ता सोडून आड वाटेला लागलो तसा खडख़ड़ाट सुरु झाला… परन्तु मागच्या वेळेपेक्षा रस्ता बराच सुधारला आहे असे प्रशस्ति पत्रक देऊन भूषण मोकळा झाला… मला मात्र ह्याच्यापेक्षा ख़राब रस्ता कसा असू शकतो असा प्रश्न पडला होता…

शेवटी कसतरी मार्गक्रमण करीत पुढे निघालो… हा हा म्हणता तासभराचा प्रवास झाला आणि एक छोटीशी खिंड ओलांडताच तैलबैला गावातील दिव्यांचा प्रकाश दिसू लागला आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला…गावात प्रवेश करताच मुक्कामाची एस टी स्वागतास उभी होती… आणि गावातले कुत्रे का कुणाच ठाऊक पण कधी नव्हे ते न भूंकता आम्हाला न्याहाळात होते… मला तर डोळ्यावरची झोप अनावर होत नव्हती… गावातील पहिल्याच घराचे प्रशस्त असे आंगण बघून तिथेच आपली पथारी पसरण्याचा बेत आम्ही आखला… मला कमी घोरण्याची तंबी देत सर्वजण झोपेची आराधना करू लागले…

 सकाळी कोंबड़याच्या कर्कश आरवण्याने मला जाग आली… तितक्यात भूषणही उठला… 'ए…  ए…  फ़क्त दहा मिनट झोपू दे… ' राजेशला उठवायला स्लीपिंग बॅगची चेन उघडताच त्याचे नेहमीचे पालुपद चालू झाले… भूषणचा एक शु कुत्र्याने जणू मांसाचा तुकड़ा समजून लंपास केला होता… मी आणि भूषणने  उगाच इकडे  तिकडे शोधण्याचा प्रयत्न केला पण जाऊ दे रे नाहीतरी जुनाच होता असे म्हणून भूषण माघारी वळला… आणि मीही त्याला बर वाटाव म्हणून शूज हरवणे चांगले असते रे वैगेरे बोलून वेळ मारुन नेली…खर तर माझा शूज हरवला असता तर त्या मी कुत्र्याच्या १२  कुळाचा उदधार केला असता ही गोष्ट निराळी…पण असो…

तैल बैलाची दुहेरी भिंत सकाळच्या कोवळया उन्हात न्हाऊन निघाली होती… इकडे आमचे राजाबाबू उर्फ़ राजेश पण उठले होते… आशीषही त्याच्या स्लीपिंग बॅगची गुंडाळी करुन तयार झाला होता…जिथे झोपलो होतो त्याच घरात पोहे अणि चहा असा नाश्ता केला आणि दुपारच्या जेवणाची ऑर्डर देऊन तैल बैलाच्या दिशेने मोर्चा वळवला…

तैलबैलाच्या खिंडीतून दिसणारा भोवतालचा आसमंत 

गप्पा टप्पा करत करत पुढे निघालो आणि तैल बैलाची उभी चढण सुरु झाली… छातीचा भाता वर खाली होत होता… पाउण तासात तैल बैलाच्या मधल्या खिंडीत पोहोचलो…थोडा वेळ भिंत न्याहाळाली… आमच्या स्वागताला माकडांचा एक ग्रुप हजर होता… त्यांच्या निघण्याची वाट बघत भूषण आणि राजेशचे आरोहणाचे आडाखे सुरु झाले…  मी आणि आशीष equipments ची जुळवाजुळव  करू लागलो… रोपची गुंडाळी सोडली… भूषणने आवश्यक ते equipments बरोबर घेतले आणि क्लाइंब ऑन अशी आरोळी ठोकून क्लाइंबला सुरुवात केली…

१० - १५ मिनिटात भूषणने पहिला टप्पा पार केला… तिथुनच मागच्याला भूषणने बिले द्यावा असे राजेशला वाटत होते पण तो जिथे उभा होता ती जागा मला फारच गैरसोयीची वाटत होती… म्हणूनच पुढचा ट्रॅवेर्स मारुन त्याने शेवटचा टप्पा पूर्ण करावा आणि तिथुन बिले द्यावा असे सर्वानुमते ठरले…

पहिला टप्पा पार पाडताना आशीष आणि बिले देताना भूषण 

पुढच्या १०-१५ मिनिटात भूषण पहिला पॅच पूर्ण केला…भूषणने तिथे सेट अप लावला आणि नंतर आशीष क्लाइंब करायला तयार  झाला… अर्ध्या तासात तोहि वर पोहोचला…तिथून बिलेची सूत्र आशीषने हातात घेतली आणि भूषण पुढे सरकला…  आशीष नंतर अस्मादिकांची पाळी होती… कधी नव्हे ते देवाचे नाव घेतले आणि चढाईला सुरुवात केली… पहिला टप्पा पूर्ण केला आणि पुढचा ट्रॅवेर्स मारताना गाड़ी थोड़ी अडकली पण मनाचा हिय्या केला आणि एकदाचा काय तो वर पोहोचलो… बरोबर ४५ मिनिटे लागली… असो… खाली राजेश वामकुक्षी घेत होता… तोहि उठला आणि क्लाइंब करून वर पोहोचला…

चारही जण वर पोहोचलो तेव्हा दुपारचे दोन वाजले होते…थोड़ी विश्रांती घ्यावी असे ठरले… खोबरयाची चिक्की आणि पाणी असा फराळ करुन सगळे हुशार झाले… पुढचा टप्पा थोडा कठीणच होता… भूषणने क्लाइंब सुरु केला… उन्हाच्या तलखीमुळे त्याला थोडा वेळ लागत होता… शेवटी हार न मानता कविराज भूषण वर पोहोचले…आशीषने नंतर प्रयत्न करुन पाहिला पण पायात गोळे आल्याने तो खाली आला… अस्मादिकांचेही तेच झाले… नंतर राजेशची पाळी होती… २-३ वेळा प्रयत्न करुन पठ्ठया वर पोहोचलाच… शेवटी वेळेचे भान राखत अधिक प्रयत्न न करता मी आणि आशीष खालीच थांबलो… भूषण आणि राजेश माथ्यावर जाऊन आले…
भूषण आणि राजेश तैल बैलाच्या माथ्यावर

ते दोघे खाली येई पर्यंत माझी आणि आशीषची सहीच्या भाषेत घोराट्याची नाळ चालू झाली म्हणजे झोप काढून झाली…थोड्या वेळात भूषण आणि राजेश रॅपल करुन खाली उतरले… जाताना राजेश माझा फोन घेऊन गेल होता… माथ्यावर गेल्यावर काही फ़ोटो त्याने काढले…ते फ़ोटो बघत थोडा टाइम पास केला आणि मग खाली उतरण्याची वेळ झाली…

तैल बैलाच्या भिंतीची पडलेली सावली 

भूषण, आशीष, मी आणि राजेश या क्रमात आम्ही खालचा पॅच रॅपल केला… equipments ची जुळवाजुळव रोपची गुंडाळी करत संध्याकाळचे ६ वाजत आले होते… बरोबर ६.३० वाजता आम्ही खाली उतरण्यास सुरुवात केली… ७  वाजता गावात पोहोचलो… पोटात भूकने कावळे ओरडत होते… दुपारीच जेवणाची ऑर्डर देऊन ठेवली असल्याने चिंता नव्हती… डाळ भात आणि भाजी ह्या मेन्युवर यथेच्छ ताव मारला… जेवत असताना परत तैल बैलाला यायचेच असे प्रत्येकजण मनोमन ठरवत होता…

रात्रीचे ९ वाजले होते…  आम्हाला आसरा देणारया त्या कुटुंबाचे आभार मानले…  मी आणि आशीषने बाइक स्टार्ट केली आणि आमचा परतीचा प्रवास सुरु झाला…


                                                                                                                             

                                                                                                                                     - संग्राम सावंत
                                                                                                                                        ९८६७५०७२३८